बाल शिवाजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

दिनांक 01/07/2024 रोजी बाल शिवाजी प्राथमिक शाळेत, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक सत्रा नुसार 1 जुलै सोमवार रोजी शाळेच्या प्रथम दिनी बालगटाच्या व वर्ग पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सर्व शिक्षिकांनी हर्षोल्हासात  विद्यार्थ्यांचे औक्षण करून फुले देऊन स्वागत केले. शाळेच्या चिमुकल्यांनी फुले घेऊन बँड च्या तालावर आनंद पूर्ण वातावरणात शाळेत प्रवेश केला. प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सरस्वती पूजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रांगोळी मध्ये ओम गिरवून विद्येची देवता सरस्वतीचा आशीर्वाद घेऊन वर्गात प्रवेश केला. विद्यार्थ्यांच्या या सत्रातील आगमनाप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. वर्गात आल्यावर विद्यार्थ्यांनी पर्यावरण प्रतिज्ञा घेतली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिसराची व परिसरातील झाडांची कशी काळजी घ्यायची याचे महत्त्व समजावून सांगितले, तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येक वर्गाची सजावट करण्यात आली. याप्रसंगी बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किर्ती चोपडे  व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर तसेच सर्व शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.