थोरांचे विचार नुसते न ऐकता प्रत्यक्ष जीवनात अंगिकारा …. प्रा. नरेंद्र देशपांडे
समाजात लोप पावत असलेली माणुसकी जपण्याची जबाबदारी तरुण पीढीवर आहे असे मत स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून प्रा. नरेंद्र देशपांडे यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंदांच्या १५३ वी जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या ४१९ व्या जयंती निमित्त १२ जानेवारी रोजी स्थानिक बाल शिवाजी माध्यमिक शाळा जठारपेठ येथे इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोल्याचे नगर संघसंचालक, तसेच प्रोफेशनल संगणक प्रशिक्षण संस्थेचे संचालक मा.श्री नरेंद्र देशपांडे होते .
दीपप्रज्ज्वलनाने व प्रतिमापुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री नरेंद्र देशपांडे यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शोभा अग्रवाल यांनी केले.
स्वामी विवेकानंदांचे जीवनचरित्र तन्मय पाठक याने आपल्या भाषणातून सांगितले . विवेकानंदांच्या कार्याची माहिती इंग्रजीतून वेदांत वैद्य याने सांगितली . स्वामीजींच्या आयुष्यातील एकाग्रता , निर्भयता यांचे महत्व सांगणारे प्रसंग गोष्टीरूपाने अदिती देशमुख हिने सांगितले . साक्षी माहोरे हिने स्वरचित कवितेतून स्वामीजीची थोरवी सांगितली.स्वामीजींच्या स्वप्नातला युवक कसा असावा हे कुणाल काटे याने विशद केले.
तर स्वामीजींनी सांगितलेले तत्त्व, विचार आजच्या काळात देखील अंगिकारण्याची गरज आपल्या भाषणातून कु आकांक्षा इंगोले हिने सांगितली.तसेच वेदांगी पाटील हिने स्वामी विवेकानंदांच्या धर्मरक्षणाबाबत चे विचार गोष्टीरूपाने मांडलेत. महाराष्ट्राचे लाडके दैवत शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या ४१९ व्या जयंती निमित्त जिजाऊ च्या कार्यकर्तृत्वाची ओळख स्वरचित कवितेतून तन्वी उपाध्ये हिने करून दिली .
अध्यक्षीय भाषणात श्री देशपांडे यांनी थोरांचे विचार नुसते न ऐकता त्यांचा जीवनात स्वीकार करावा , माणुसकी जपण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे . तसेच देश सबल बनविण्यासाठी विवेकानंदांचे तत्त्वज्ञान दररोज थोडे तरी वाचावे असे मत याप्रसंगी व्यक्त केले . समाजाला बदलण्याची इच्छा असेल तर सरुवात स्वतःपासून करा आणि जीवनात सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारा असे मौलिक विचार छोट्या छोट्या प्रसंगातून श्री देशपांडे यांनी विध्यार्थ्यांना सांगितले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी रेळे हिने उत्कृष्टपणे केले .
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अविनाश देव,शाळा समिती सदस्या सौ. अनघा देव , मुख्याध्यापिका , शिक्षकवृंद , विध्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली.