गुढीपाडवा व स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न

दरवर्षी प्रमाणे ब्राह्मण सभेतर्फे जठारपेठ स्थित स्वा. सावरकर सभागृहात गुढीपाडव्या निमित्त स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. गणेशपूजन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

प्रा. कौमुदिनी क्षीरसागर बर्डे यांनी गायलेल्या सुगमसंगीताने श्रोते मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले आ. गोवर्धन शर्मा यांनी सर्व ज्ञाती बांधवानी संघटित होऊन कार्य करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे प्रा. भाऊसाहेब मांडवगणे, ज्येष्ठ नेत्रशल्यचिकित्सक डॉ. बाबासाहेब तारे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शुभदाताई जोशी यांचा डॉ. नानासाहेब चौधरी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी अध्यक्षिय भाषणात डॉ. चौधरी यांनी ‘आपण नवीन पिढीला काय देत आहोत याचा विचार करण्याची गरज आहे.’ तसेच ज्ञाती बांधवांच्या मुलांसाठी हॉस्टेल बांधण्याची गरज व्यक्त केली.

आपली उपजीविका सांभाळताना समाजसेवेचे व्रत म्हणून प्रत्येकाने समाजकार्यात सहभागी होण्याची गरज आहे  असे प्रामुख्याने सांगितले. प्रा. भाऊसाहेब मांडवगणे यांनी सत्काराला उत्तर देताना ‘हा सन्मान आपला नसून विद्यार्थी,शिक्षक व प्राध्यापकांचा सत्कार असल्याचे सांगितले’. या कार्यक्रमात बोलताना डॉ. बाबासाहेब तारे यांनी ‘पैशासाठी रूग्णांची परवड होऊ दिली नाही.’ याचे समाधान व्यक्त केले.

पुढील वर्षा पासून याच  कार्यक्रमात निलेश देव यांच्या मार्फत पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्यास स्व. अंबरीश कवीश्वर स्मृती पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र देशपांडे यांनी तर मंजिरी ठोसर यांनी पसायदान म्हणत समारोप केला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब देव, अनघा देव प्रा. मोहन गद्रे यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित गणमान्य नागरिकांची मोठी उपस्थिती होती.